अक्षरायच्या प्रमुख समिती सदस्यांमध्ये भारतीय अक्षररचना आणि सुलेखनाचा अजोड अनुभव आणि कौशल्य असलेल्या शिक्षक आणि कला-व्यावसायिकांचा समावेश आहे. एक खंबीर कार्यकारी समिती आणि निष्ठावान स्वयंसेवकांची एक फळी अक्षरायच्या प्रमुख समितीला सातत्याने बळ देत असतात.
विनय सायनेकर
स्व. प्राध्यापक र. कृ. जोशी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली विनय सायनेकरांनी अनेक सुलेखन आणि मुद्राक्षरकलेच्या अनेक प्रकल्पांवर काम केले आहे. सायनेकरांनी चिमणलाल प्रा. लि. या कंपनीमध्ये मुख्य डिझाईन सल्लागार म्हणून काम केले आहे, शिवाय ते सव्वीस वर्ष सर. ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयामधे सुलेखन आणि मुद्राक्षरकला या विषयांचे अध्यापक होते. ‘थ्री कॅलिग्राफर्स’ या सामुहिक कार्यक्रमामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता. कॉर्पोरेट कंपन्यांकरता कन्नड, बंगाली, आसामी आणि देवनागरी अश्या विविध लिप्यांमध्ये मजकूराची रचना करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ‘अक्षरसौंदर्य – निर्मिती आणि इतिहास’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून सुलेखनासंबंधी, विशेषतः मुलांमध्ये, जागृती निर्माण करण्याकरता सायनेकर प्रयत्नशील आहेत.
संतोष क्षीरसागर
१९६७मध्ये जन्मलेल्या संतोष क्षीरसागर यांनी सर. ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयामधून बी.एफ.ए. आणि संशोधनानंतर एम.एफ.ए. या दोन्ही पदव्या प्राप्त केल्या*. संतोष क्षीरसागर सध्या आय.आय.टी. मुंबईस्थित इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर येथून पीएच.डी.च्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. मायक्रोसॉफ्ट विंडोज XP साठी, गुजराती, उडिया भाषांमधील टंकांची, OTF या प्रकारातील सर्वप्रथम केलेली निर्मिती ही त्यांच्या महत्वाच्या कामांपैकी एक म्हणून उदाहरणादाखल देता येईल. क्षीरसागर यांनी भारतीय सुलेखनासंबंधी, जर्मनी, बेल्जियम, जपान व इंग्लंड या देशांतील नावाजलेल्या संस्थांमधून, विविध परिषदा तसेच कार्यशाळांमधून आणि अनेक प्रकाशनांमधून आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या कामाचा ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतल्या प्रदर्शनांत समावेश करण्यात आला आहे. प्रा. मोरी कूओन यांच्यासह जपानमध्ये झालेल्या प्रदर्शनात त्यांच्या कामाचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. गेली पंचवीस वर्षे ते स्वतःला घडवणाऱ्या या विद्यालयातच भारतीय सुलेखन (विशेषत: देवनागरी), मुद्राक्षरकला आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाइन या विषयात अध्यापन करत आहेत.
शुभानंद जोग
शुभानंद जोग यांनी सर. ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयामधून बी.एफ.ए. आणि संशोधनानंतर एम.एफ.ए. या दोन्ही पदव्या प्राप्त केल्या. याच विद्यालयात ते गेली पंचवीस वर्षे शिक्षक मंडळाचे सदस्य आहेत. ‘एंजल ऑफ पीस’ या जोग यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या लघुचित्रपटाचं प्रदर्शन टेक्सास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, वर्ल्ड सोशल फोरम (मुंबई), आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्पर्धा विभागात झाले आहे. ख्यातनाम कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांच्या ‘साइटेशन्स – मानपत्राज’ या पुस्तकाच्या सुलेखनाचं आणि रचनेचं काम केलं आहे, शिवाय अजित वाडेकर, विंदा करंदीकर, ज्युलियो एफ. रिबेरो, आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांसारख्या दिग्गजांच्या पुस्तकांत सहभाग दिला आहे. त्यांनी तीसहून अधिक कार्यशाळा सुलेखन या विषयावर आयोजित केल्या आहेत, आणि अनेक सर्जनशील कार्यशाळा आणि परिसंवादांमध्ये भाग घेतला आहे.
सारंग कुळकर्णी
टंक रचनाकार, सुलेखनकार आणि मुद्राक्षरकार सारंग कुळकर्णी यांनी २००२ मध्ये सर. ज.जी. उपयाजित कला महाविद्यालयामधून पदवी संपादन केली. कुळकर्णी हे ‘WhiteCrow Designs’ या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांकरता भारतीय आणि लॅटिन भाषेतील टंक, एक अफाट ग्राफिक आणि आयडेंटिटी रचनांचा पोर्टफोलिओ, तसेच सुलेखनांचे अनेक प्रकल्प हाताळले आहे. प्रा. र. कृ. जोशी आणि प्रा. संतोष क्षीरसागर यांच्यासोबत काम करत कुळकर्णी यांनी मायक्रोसॉफ्ट विंडोज XP च्या टाईप डिझाईनच्या प्रकल्पांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. २०१३ मधे ‘एक टाइप’ या टाइप फाउण्ड्री चे हे भागीदार आहेत. एक टाइप फाउण्ड्रीने मुक्त, मोदक, बलू असे फॉण्टस् गुगलला देउन जगासाठी मुक्तस्त्रोत केले आहेत.
गिरीश दळवी
गिरीश दळवी हे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आय॰ आय॰ टी॰) मुंबई येथील औद्योगिक अभिकल्प केन्द्रात (आय॰ डी॰ सी॰) अभिकल्प ह्या विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते संप्रेषण अभिकल्प, अन्योन्यक्रिया अभिकल्प आणि अभिकल्प संशोधन ह्या विषयांचे अध्यापन करतात. त्यांचे संशोधनाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. संप्रेषण अभिकल्प — देवनागरी मुद्राक्षरविद्या (देवनागरी टंकांचा इतिहास, टंकरचनेच्या कार्यपद्धती, देवनागरी मुद्राक्षरांचे सैद्धान्तिक प्रारूपण, वर्गीकरण आणि टंक-संस्कृती). अन्योन्यक्रिया अभिकल्प — संस्कृतिसापेक्ष अन्योन्यक्रिया (उदा॰ संगणक-मानव-संवादातील स्थानिकीकरण), अल्पमोली संगणन (कमी खर्चाच्या संगणनाच्या सोयी. उदा॰ आकाश टॅब्लेटसारखी अल्पमोली साधने), माहिती शोधण्याचे निकष, भारतीय भाषांकरता संवादपटल (इंटरफेस) तसेच भारतीय लिप्यांत मजकूर नोंदवण्याच्या सोयी. अभिकल्प प्रक्रियेतील सांख्यकीय आणि गणिती प्रारूपे तयार करण्याची तंत्रे हा एक अभिकल्प संशोधक म्हणून दळवी ह्यांचे संशोधनाचे विषय आहे. त्यांनी संगणक-अभियांत्रिकी ह्या विषयात स्नातक पदवी, अभिकल्प ह्या विषयात स्नातकोत्तर पदवी तसेच आय॰ आय॰ टी॰, मुंबई येथून पीएचडी ह्या पदव्या संपादित केल्या आहेत. ‘देवनागरी मुद्राक्षरांचे सैद्धान्तिक प्रारूपण’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. ‘एक’ हा बहुलिपी टंकसमूह, ‘एक मुक्त’ हा मुक्तस्रोत टंकसमूह , ‘लाइफओके’ हा देवनागरी टंक आणि ‘स्टार बंगाली’ हा बाङ्ला टंक ह्यांसारखे विविध भारतीय लिप्यांचे टंक तयार करण्यात टंकरचनाकार म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे.